खंडाळा – शिरवळ, ता. खंडाळा येथे लाकडी बॉक्स बनवणार्या कारखान्याला शनिवारी पहाटे भीषण आग लागून, 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एशियन पेंटस्च्या अग्निशमन दलाचे कर्मचार्री, शिरवळ पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तब्बल साडेचार तास अथक परिश्रम करून, आगीवर नियंत्रण मिळविले.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथे गट नं. 326/1 मधील पोपट तालवर यांच्या जागेत राहुल शिवाजी मोटे यांचे मातोश्री पॅकेजिंग वर्कशॉप आहे. तेथे लाकडी पॅलेटस् आणि बॉक्स बनवले जातात. या कारखान्यास शनिवारी पहाटे 5.30 च्या सुमारास आग लागल्याचे कारखान्यातील कामगार हरिश्चंद्र चौधरी यांना दिसले. त्यांनी राहुल मोटे यांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुषार कुंभार, दीपक पालेपवाड हे एशियन पेंटस्चा अग्निशामक बंब आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने, तब्बल साडेचार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत एक लाख 20 हजार रुपये किमतीचे एअर कॉम्प्रेसर, एक लाख 40 हजार रुपये किमतीचे संगणक, प्रिंटर, स्कॅनर, इन्व्हर्टर, पंधरा हजार रुपयांचे ऑफिस साहित्य, सहा लाख 40 हजार रुपयांची गन मशीन, स्टेपल मशीन, कपाट, नेल्स बॉक्स, रंधा मशिन, अडीच दोन लाखांचे कटिंग मशीन, मोटार, फायर एक्स्टिंग्विशर, हँड ग्राइंडर, साडेपाच लाखांचे प्लायवूड, चार लाखांचे लाकूड, एक लाखाचे रबरवूड, इलेक्ट्रिक साहित्य, अडीच लाखांचे पत्रा शेड व इतर साहित्य जळून खाक झालेे. या घटनेची फिर्याद राहुल मोटे यांनी दिली असून, पोलीस उपनिरीक्षक अब्दुल हादी बिद्री तपास करत आहेत.