बेंगळुरू – करोनामुळे क्रीडाक्षेत्र ठप्प पडलेले असताना प्रशिक्षकांना व सहाय्यकांना आर्थिक मदतीची खरी गरज असल्याचे मत भारताचा माजी ऑल इंग्लंडविजेता बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद याने व्यक्त केले आहे.
भारतीय बॅडमिंटनचा राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक असलेल्या गोपीचंद याने देशातील सर्व राज्य संघटनांना त्यांच्या प्रशिक्षकांना व सपोर्ट स्टाफला मदत करण्याचे आवाहन केले आहे. संघटनेसाठी सदस्य, खेळाडू जितके महत्त्वाचे असतात तितकेच महत्त्वाचे प्रशिक्षक व सहकारी असतात. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांना दिवस कंठणे कठीण होऊन बसलेले असताना त्यांना मदत करणे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. स्पर्धा स्थगित केलेल्या असताना या प्रशिक्षकांना कमाईच होत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. घर कसे चालवायचे, रोजच्या गरजा कशा भागवायच्या हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला असताना आपणच पुढाकार घेतला पाहिजे, असेही गोपीचंद यांनी सांगितले.
देशात लॉकडाऊन असून त्यात काही सवलती जरी दिलेल्या असल्या तरीही प्रशिक्षकांना मात्र अद्याप काम सुरू करता आलेले नाही त्यामुळे खेळाडूंना देखील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सराव करण्यास परवानगी दिलेली नाही. खेळाडू वैयक्तिक सराव करत असले तरीही सगळ्या प्रशिक्षकांना आपली सराव शिबिरे सुरू करणे शक्य झालेले नाही. भारतीय बॅडमिंटन संघटनादेखील लवकरच त्यांना मदत करेल. त्याचबरोबर देशातील सर्व संघटनांनी त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची नितांत गरज आहे, असेही गोपीचंद म्हणाले.