सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करण्याच्या सूचना
पुणे – स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून महापालिकेच्या हद्दीतील 25 चौकाचे सुशोभिकरण होणार आहे. यातील पहिल्याच कामाला वाहतूक पोलिसांनी ब्रेक लावला आहे. यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न झाल्याने विश्रामबाग वाडा वाहतूक विभागाकडून हे काम बंद केले. दरम्यान, कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी हे काम थांबवले होते. तसेच, त्याची पूर्तता झाल्यानंतर काम सुरू करण्यास सांगितल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीकडून पॅन सिटी उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख 25 रस्त्यांचे सुभोभिकरण होणार आहे. त्यांतर्गत या चौकांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासह चौकाच्या चारही बाजूला 50 मीटरपर्यंतच्या पदपथांची दुरुस्ती, त्याची फेररचना तसेच वेगवेगळी विकासकामे करण्यात येणार आहे. त्यात लाल बहादूरशास्त्री रस्त्यावरील टिळक चौक, अलका चौक, विसावा मारूती चौक तसेच गांजवे चौकाचा समावेश आहे. स्मार्ट सिटीकडून हे काम रविवारी गांजवे चौक ते विसावा मारूती चौकादरम्यान पदपथ खोदाईपासून सुरू केले. त्यासाठी स्मार्ट सिटीकडून आवश्यक ती खबरदारी घेत कामाची माहिती असलेले फलकही लावले. मात्र, आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याने विश्रामबाग वाहतूक विभागाने हे काम थांबवले होते.
स्मार्ट सिटीकडून रस्त्याच्या बाजूला काम सुरू केल्यानंतर सुरक्षा उपाययोजना केल्या नव्हत्या. त्याबाबत त्यांना त्याची तातडीने पूर्ताता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात खोदाईनंतर रस्त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी बॅरिकेट लावणे, कामाच्या माहितीचे फलक लावणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करणे अशा सूचनांचा समावेश होता. त्याची पूर्तात त्यांच्याकडून झाली आहे. त्यानंतर त्यांना काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, इतर ठिकाणी त्यांचे काम सुरू असल्याने त्यांच्याकडून अद्याप हे काम सुरू केलेले नाही. त्यांना कामासाठी परवानगी देण्यात आली आहे.
– भरत चंदनशिवे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, विश्रामबागवाडा पोलीस स्टेशन