स्वत:चाच उत्पन्नाचा रेकॉर्ड मोडण्यात अपयश
पुणे – प्रदूषणमुक्त प्रवासासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी पीएमपीने सोमवारी विक्रमी बस संचलनात आणत 2 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, “बस डे’ दिवशी प्रशासनाला केवळ 1 कोटी 83 लाखांचे उत्पन्न गाठता आले. परंतु, गेल्या महिन्यांत सुमारे 1,600 बस मार्गावर आणत 1 कोटी 89 लाखांचे सर्वाधिक उत्पन्न मिळविले होते. मात्र, “बस डे’निमित्त मागील उत्पन्नाचा रेकॉर्ड मोडता आला नाही.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल)मार्फत “बस डे’चे आयोजन केले होते. यानिमित्त अनेक नादुरुस्त बस सुस्थितीत आणत एकाच दिवशी 2 कोटी उत्पन्न मिळविणार असल्याचे सांगितले होते. सकाळच्या सत्रात पासची संख्या जास्त असल्याने केवळ पासचे उत्पन्न 38 लाखांचे होते. तर, दुपारच्या सत्रात उत्पन्न कमी मिळाल्याने उद्दिष्ट गाठता आले नाही. मात्र, इतर दिवसांच्या तुलनेत प्रवासी संख्या वाढवत उत्पन्नही वाढले आहे.
केवळ दहा बसेस ब्रेकडाऊन
पीएमपीच्या दैनंदिन संचलनात सुमारे 100 बस ब्रेकडाऊन होतात. मात्र, “बस डे’ असल्याने पीएमपीने बहुतांशी गाड्यांची तपासणी करत संचलनात पाठविल्या होत्या. त्यामुळे “बस डे’ दिवशी भाडेतत्वावरील 6 तर, पीएमपीच्या मालकीच्या 4 बस ब्रेकडाऊन झाल्या.
25 ते 30 लाखांनी उत्पन्नात वाढ
दैनंदिन संचलनात सुमारे 1300 ते 1400 बस ठेवत 1 कोटी 45 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. “बस डे’निमित्त इतर दिवसांच्या तुलनेत प्रवासी संख्या वाढत 25 ते 30 लाखांनी उत्पन्न वाढल्याचे दिसून आले.