बोरणे घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीस अडसर

सज्जनगड पायथ्याशी झाडे पडल्यानेही व्यत्यय; रस्ता तात्पुरता खुला
ठोसेघर (प्रतिनिधी)-
सातारा तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. विशेषतः परळी खोऱ्यासह ठोसेघर, कास या भागाला पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे गुरूवारी मध्यरात्री सज्जनगड- बोरणे घाटात दरड कोसळून मोठे दगड रस्त्याच्या मधोमध येऊन पडले. त्याचबरोबर सज्जनगडाच्या पायथ्याशी घाट मार्गावर दोन ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीस अडसर निर्माण झाला होता.

सातारा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील ठोसेघर आणि आसपासच्या परिसरातील अनेक दुर्गम वाड्यावस्त्यांना सातारा शहराशी जोडणाऱ्या सज्जनगड- बोरणे घाटात गुरूवारी मध्यरात्री सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दरडीचा काही भाग रस्त्याच्या मधोमध येऊन कोसळला. मोठमोठे दगड असल्याने वाहतुकीस मोठा अडसर निर्माण झाला. सज्जनगडाच्या पायथ्याशी घाट मार्गावर दोन झाडेही मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या बाजूला उन्मळून पडल्याने सकाळच्या वेळी काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

सकाळी सातच्या सुमारास या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणारे पवन ऊर्जा प्रकल्पाचे कर्मचारी आणि काही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील मोठे दगड आणि दरडीचा भाग हटवून रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान, प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये बोरणे घाटात दरडी कोसळणे, रस्ता खचणे, झाडे उन्मळून रस्त्यावर पडणे असे प्रकार सूरू असतात. त्यामुळे कित्येक वेळा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच या घाट मार्गावरील धोकादायक दरडी आणि झाडे हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित
परळी खोऱ्यातील दुर्गम भागातील जनजीवनावर तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम झाला असून बऱ्याच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्याने आणि धुसर वातावरणामुळे मोबाइल नेटवर्कचे बारा वाजले आहेत. त्यामुळे एकमेकांशी असणारा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर या भागातील छोटे- मोठे ओढे, ओहोळ आणि तलाव ओसांडून वाहू लागले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर खो बसला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.