प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 19 – “बोल बजरंग बली की जय’ यासह डिजेंची गाणी आणि पाण्याचे फवारे अंगावर घेऊन बेधुंद होऊन नाचण्यासाठी गोपाळभक्तांसह गोविंदांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडी मंडळांपुढी मोठी गर्दी केली होती. दहीहंडी सोहळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पोलीस आणि वाहतूक विभागाकडून प्रमुख रस्त्यांसह काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे नदीपात्र किंवा जिथे जागा मिळेल त्याठिकाणी वाहने पार्क करून गोविंदा दहीहंडीचा आनंद घेत होते. मात्र, अस्थाव्यस्थ पार्किंग आणि रस्ते बंद असल्याची माहिती नसल्यामुळे कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली.
टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रोड, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता यासह अन्य मर्गावर संध्याकाळानंतर वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. उपनगरांमध्ये मुख्य रस्त्याकडेला तसेच अंतर्गत रस्त्यावर दहीहंडी साजरा करण्यात आली त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाने जावे लागले.