पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या कारी-२०२४ ला घोले रोड, शिवाजीनगर येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये प्रारंभ झाला.
चार दिवस चालणाऱ्या कला महोत्सवात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृती सर्वांना पाहण्यासाठी खुल्या असणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते, तर प्रसिद्ध वास्तुविशारद ऋषिकेश कुलकर्णी व गिरीश दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राम मंदिर प्रतिकृतीचे पूजन व दीपप्रज्वलनद्वारे झाले.
याप्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे, डाॅ. मिलिंद ढोबळे, डाॅ. अश्विनी पेठे, डाॅ. नचिकेत ठाकूर, डाॅ. आनंद बेल्हे, डाॅ. वीरेंद्र शेटे, प्रा. प्रसाद निकुंभ, डाॅ. तुषार पंके आदी उपस्थित होते. दरम्यान, या कला उत्सवाची सांगता शनिवारी (दि. २०) होणार असून, सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वासुदेव कामत यांना विश्वारंभ कला पुरस्कार
कारी उत्सवात शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता चित्रकलेतील बहुमूल्य योगदानाबद्दल जगद्विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांचा प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते विश्वारंभ कला पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या वेळी संस्थापक डाॅ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. मंगेश कराड, तसेच आदिनाथ मंगेशकर, ज्योती ढाकणे आदी उपस्थित राहणार आहेत.