वाहतूककोंडीने भूगावचा जीव गुदमरला

पुणे-पौड-ताम्हिणी महामार्गावर सकाळी, संध्याकाळी वाहनांच्या रांगा नित्याच्याच

पिरंगुट/पुणे – पुणे-पौड-ताम्हिणी या महामार्गाचे काम सुरू असून यात अनेक त्रुटी भूगाव (ता. मुळशी) येथे होत असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामाचा फटका प्रवाशांना दररोज बसत आहे. रोडवेज कंपनीच्या नियोजनशून्य कारभरामुळे रविवारी (दि. 16) सकाळी जवळपास चार ते पाच तास वाहतूककोंडी झाली होती.

त्यामुळे वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, भूगावमध्ये अगोदरच होणाऱ्या वाहतूक कोंडीने आता मोठे रूप धारण केले आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी चांदणी चौक ते पिरंगुट हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांचा तीन ते चार तासांचा कालावधी जात असून बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संताप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षितेसाठी आवश्‍यक उपाययोजना केलेल्या नाहीत. रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंटचे काम सुरू असल्याने एकाच लेनमध्ये दुहेरी वाहतूक असते. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो.महामार्गावरील साईडपट्टे न करता आधी रस्त्याचे काम सुरू केल्याने वाहनांना जागा उपलब्ध नाही. तसेच, पादचाऱ्यांनाही वाट राहिली नाही. भुगाव या ठिकाणी 10 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते एक तास इतका वेळ लागतो. सुरक्षिततेच्या उपाययोजना नसणे, ट्रॅफिक वॉर्डन आणि पोलिसांची नेमणूक नसल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

पुणे-दिघी पोर्ट या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. या रस्त्यावरून दिवसाला सरासरी दीड लाख वाहने ये-जा करतात. मुळशीमध्ये विविध औद्योगिक कंपन्या, शाळा-महाविद्यालये आहेत. तसेच, कोकणात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. त्यानुसार या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामामध्ये एकसूत्रता नसल्याचे दिसून येत आहे.

तुकडे-तुकडे पद्धतीने या रस्त्याचे काम सुरू आहे. आधी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून साईटपट्या करून मगच सिमेंटच्या रस्त्याचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, आहे त्या रस्त्यावरच काम सुरू केले आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या रस्त्यावरूनच दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच रस्त्यालगत असलेली दुकाने आणि दुकानांसमोर असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडते.

पौड पोलिसांचे दुर्लक्ष
मुळशी तालुक्‍यात प्रवेश करताना भुगाव लागते. याठिकाणी सुरुवातीलाच प्रवाशांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे पुण्याच्या दिशेने आणि पुण्याहून पौडकडे जाणाऱ्या अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनांचा रांगा लागल्याचे पहायला मिळते. येथील वाहतूक कोंडीकडे पौड पोलिसांचेसुद्धा दुर्लक्ष होत आहे. पौड पोलिसांकडून याठिकाणी पोलीस आणि होमगार्ड तैनात असल्याचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र याठिकाणी पोलीस उपलब्ध नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पुण्यात काम आणि अधिकारी मुंबईला
पुणे-पौड-ताम्हिणी-दिघी पोर्ट या रस्त्याच्या कामकाजावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियंत्रण आहे. एमएसआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रश्‍नावर मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र, एमएसआरडीसीचे अधिकारी सुद्धा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एमएसआरडीसीकडून रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्याचे नियंत्रण व देखरेख हे मुंबई येथील कार्यालयातून होत आहे.

पदाधिकारी घेणार “दादां’ची भेट
एमएसआरडीसीकडून करण्यात येणारे काम आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षातील पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

मी या रस्त्याने नुकताच प्रवास केला आहे. या रस्त्यावर कुठेच सुरक्षिततेच्या सूचना अथवा उपाययोजना केल्याचे दिसले नाही. रस्त्याचा एक एक टप्पा पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, अर्धवट आणि टप्प्या टप्याने रस्त्याचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच प्रवाशांना त्रास होणार नाही, याची खबरदारी एमएसआरडीसीने घेणे आवश्‍यक आहे.
– विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.