उन्हाळ्यापूर्वीच पाइपलाइनवरूनसंतप्त पडसाद

वाल्हे -वागदरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मुरूजीचीवाडी, बाळाजीचीवाडी, बहिर्जिचीवाडी, पवारवाडी, वडाचीवाडी, झापाचीवाडी या वाड्यांना टंचाईच्या काळात टंचाई उपाययोजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी वागदरवाडी ते बहिर्जिचीवाडी अशी वीस लाख रूपये खर्चाच्या पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे.

मात्र, ही पाइपलाइन करताना व योजना कार्यान्वित करताना ग्रामस्थांना विचारात न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी या योजनेला सुरूवातीपासूनच विरोध दर्शवला होता. तरीही ही योजना पूर्ण केल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे. वागदरवाडी (ता. पुरंदर) येथे उन्हाळ्यातील पाणीटंचाई संदर्भात सरपंच उषा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांचे पडसाद उमटले.

वाल्हे येथील विहिंरीवरून पाइपलाइन जोडायची आहे. ती विहीर वागदरवाडीला पाणी पुरवठा करणारी आहे. वाल्हे गावांमधील ही विहीर असल्याने याच उन्हाळ्यामध्ये विहिरीत अनेक वर्षांपासून टॅंकरचे पाणी आणून सोडावे लागत आहे. त्यामुळे ही विहिर अगोदरच टंचाईग्रस्त आहे.

याच विहिरीच्या पाइपलाइनला बहिर्जिचीवाडीकडे गेलेल्या व नव्याने केलेल्या पाइपलाइनला जोडण्यास ग्रामसभेत हात वर करून मोठा विरोध करण्यात आला. त्यामुळे अधिकारी व ग्रामस्थांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. मात्र, वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी, पाण्याचा स्रोत पाहून, नवीन विहिर खोदण्याबाबतीतील ठराव एकमताने पास
करण्यात आला.

यावेळी वरिष्ठ भू वैज्ञानिक जगताप, कनिष्ठ भू वैज्ञानिक अधिकारी साबळे, ग्रामसेवक मनोज ढेरे, वाल्हे गावचे माजी उपसरपंच पोपट पवार, महेंद्र पवार, सुनील पवार, बंटी भुजबळ, अविनाश कदम, सुनील कदम, अंकुश पवार, बापू पवार, किशोर पवार, सचिन पवार, महिला उपस्थित होत्या.

अधिकारी- ग्रामस्थांमध्ये खडाजंगी
उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या काळात वागदरवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी वाल्हे येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून वाल्हे येथील विहिरीची पाणी पातळी खलावली आहे. त्यामुळे विहिरीमध्येच टॅंकरने पाणी आणून सोडावे लागत आहे. विहिरीतून येणाऱ्या पाइपलाइन नव्याने सहा वाड्यांसाठीच्या पाइपलाइनला जोडण्यास ग्रामसभेत ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे अधिकारी व ग्रामस्थांमध्ये खडाजंगी झाली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.