सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कामगारांकडून दंड वसूल
पुणे – वाहतूक विभागात शहरातील नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी टोईंग वाहनांवर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र, हे कामगारच नागरिकांकडून दंड वसूल करत असल्याचे समोर आले आहे. एका सजग नागरिकाने व्हिडीओच्या माध्यमातून ही बाब समोर आणली असून व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील ही घटना असून यात टोईंग कर्मचारी वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत ई-चलनाद्वारे दंड वसूल करत असल्याचेही दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात नो पार्किंगमधील काही वाहने टोईंग करून आणण्यात आली होती. प्रभाकर सूर्यवंशी या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढला आहे. सूर्यवंशी हे कामानिमित्त येथून जात असताना त्यांना गर्दी जमलेली दिसली. त्यांनी पाहिल्यानंतर वाहनावरील कर्मचारीच दंड वसूल करत असल्याचे दिसून आले.
काही वाहनांचे सीसीटीव्ही बंद
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहने उभी केली जातात. नो पार्किंगमधील वाहने उचलल्यानंतर होणारा गैरकारभार थांबविण्यासाठी काही महिन्यांपूर्वी वाहतूक विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक टोईंग वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांना सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आली आहेत. मात्र, काही वाहनांचे सीसीटीव्ही बंद आहेत. वाहने उचलण्याची कार्यवाही कंत्राटी कामगार करतात. मात्र, वाहतूक विभागाचा कर्मचारी सोबत ठेवणे अनिवार्य आहे. वाहने उचलण्याची अथवा उचलून आणलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, काही ठिकाणी कंत्राटी कामगाराच दमदाटी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या घटनेबाबत संबंधित व्हिडीओची पाहणी करून तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग