मुझफ्फराबाद – पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये नीलम- झेलम नदीवर चिनी कंपन्यांकडून मोठी धरणे बांधण्याच्या विरोधात पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये आज विशाल मशाल मोर्चा काढण्यात आला. “दर्या बचाओ, मुझफ्फराबाद बचाओ’, “नीलम-झेलम बहने दो, हमे जिंदा रहने दो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
पाक व्याप्त काश्मीरमध्ये आझाद पट्टन आणि कोहला हे दोन मोठे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि चीन दरम्यान अलिकडेच करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चीन-पाकिस्तान आर्थिक कोरिडॉरचा भाग असलेला आझाद पट्टन जलविद्युत प्रकल्प हा 700.7 मेगावॅट क्षमतेचा आहे. त्याच्या उभारणीसठी 1.54 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित असून त्याच्या करारावर 6 जुलै रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पाला चायना गेझहोबा ग्रुप कंपनीकडून प्रायोजित केले जाणार आहे.
कोहला हायड्रोइलेक्ट्रीक पॉवर प्रोजेक्ट “पीओके’मधील सुधानोटी जिल्ह्यात आझाद पट्टन पूलापासून 7 किलोमीटर अंतरावर झेलम नदीवर उभारला जाणार आहे. हे ठिकाण इस्लामाबादपासून 90 किलोमीटर अंतरावर असून 2026 पर्यंत त्याची उभारणी पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि या प्रकल्पासाठी 3 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला चायना थ्री जॉर्जेस कॉर्पोरेशन, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आणि सिल्क रोड फंडकडून प्रायोजित केले जाणार आहे.
या प्रकल्पांमुळे या भागात चिनी कामगार मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. मोठ्या धरणांमुळे नद्यांचे प्रवाहही बदलले जात आहेत. दीर्घकाळापासून या प्रकल्पांना स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे स्थानिक नेते डॉ. अमजद आयुब मिर्झा यांनी म्हटले आहे. या नद्या प्रदुषित होत आहेत. पिण्यासाठीही पणी उपलब्ध होत नाही आहे. शेतीसाठीही पाणी उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे आणखीन वाढण्याचा धोकाही आहे.