खडकवासलातून 17 हजार 700 क्यूसेकने विसर्ग
पुणे – खडकवासला धरण भरल्याने तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अद्यापही पाऊस सुरू असल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नदीकाठचा भाग असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या क्षेत्रीय कार्यालयांकडे प्रत्येकी 25 कर्मचाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली असून आवश्यक यंत्रसामग्रीसह ही पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे हे धरण भरले आहे, त्यामुळे धरणातून सायंकाळी 12 हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे, हा विसर्ग 18 हजारपर्यंत वाढविण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठचा भाग असलेल्या वारजे-कर्वेनगर, सिंहगड रस्ता, घोले रस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, येरवडा, तसेच हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.
तर शहरात 27 हजार क्यूसेकला सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडील विठ्ठलवाडी तसेच परिसरात पाणी घुसत असल्याने या भागात क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच डेक्कन नदीपात्रात राहणाऱ्या रस्त्यावरील नागरिकांनाही हलविण्यात आले असल्याचे सोनूने यांनी सांगितले.