मुदत ठेवींवरील व्याजाचे उत्पन्न कमी हेणार
पुणे – ठेवीवरील व्याजदर कमी करण्यात स्टेट बॅंकेने पुढाकार घेतला असून विविध मुदत ठेवीवरील व्याजदर 26 ऑगस्टपासून 0.50 टक्क्यापर्यंत कमी होणार आहेत. या पंधरवड्यात इतर बॅंकाही ठेवीवरील व्याजदर कमी करणार आहेत. हळूहळू ठेवीवरील व्याजदर रेपोदराशी संलग्न केले जातील, असे बोलले जाते.
स्टेट बॅंकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर 5 वरून साडेचार टक्के करण्यात आले आहेत. 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करून साडेपाच टक्के करण्यात आले आहेत. 180 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर 0.25 टक्क्याने कमी करून 6 टक्के करण्यात आले आहेत. मात्र, एक ते दोन वर्ष मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर केवळ 0.10 टक्क्याने कमी करून 6.70 टक्के करण्यात आले आहेत.
तर पाच ते दहा वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 0.25 टक्क्याने कमी करून सव्वासहा टक्के करण्यात आले आहेत. तर, बॅंकेने 1 लाख रुपयांवरील सेविंग बॅंक डिपॉझिटवरील व्याजदर 3 टक्के या पातळीवर कायम ठेवले आहेत. यात एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर साडेतीन टक्के व्याज कायम आहे.