शिवसेनेचा “हंडा मोर्चा’

विस्कळीत पाणी पुरवठ्याचा निषेध : प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पिंपरी –“निगडी प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे’, “पाणी कपात रद्द झालीच पाहिजे’, “शहरवासियांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे’, “पाणी आमच्या हक्काचे’, “पाणी गळती थांबलीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा देत शिवसेनेच्या वतीने गुरुवारी “अ’ क्षेत्रीय कार्यालयावर “हंडा मोर्चा’ काढण्यात आला.

शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या नेतृत्वाताखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बाळासाहेब वाल्हेकर, उपशहरप्रमुख अमोल निकम, पिंपरी विधानसभेच्या महिला संघटिका सरिता साने, समन्वयक भाविक देशमुख, विभागप्रमुख पार्थ गुरव, उपविभागप्रमुख विकास भिसे, महेश जाधव, शाखा प्रमुख शरद जगदाळे, दिपक कोटकर, त्रिभुवन मुल्ला, युवा अधिकारी सागर पांढारकर, निलेश जांभळे, सचिन नागपुरे, अनुजा कुमार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“अ’ क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक कुंभार यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. नगरसेवक अमित गावडे म्हणाले, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. तरी देखील शहरवासियांना मुलबक आणि पुरेसे पाणी मिळत नाही. प्रभाग क्रमांक 15 मधील सेक्‍टर नंबर 24 ते 28 , निगडी, प्राधिकरण, निगडी गावठाण या परिसरातील पाणी प्रश्‍न अतिशय गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

प्राधिकरणातील नागरिकांना पुरेसे पाणी देखील मिळत नाही. याबाबत सातत्याने तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नाही. काही भागातील जलवाहिनीला छिद्रे पडली आहेत. त्यात चेंबरमधील गढूळ पाणी मिसळत आहे. नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत असून साथीचे आजार पसरण्याची भीती आहे, असेही ते म्हणाले. प्राधिकरणातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यात यावा. तक्रारींचे निराकरण करावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावडे यांनी दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here