१ आम्ही गद्दार नव्हे तर खुद्दार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी नाही केली. बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस राष्ट्रवादी आमचे शत्रू आहेत. त्यांना कधी जवळ करायचं नाही. त्यांना जवळ करायची वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाशी गद्दारी केली असती तर आमच्या स्वागतासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा थांबले असते का, आमची भूमिका राज्यातील जनतेने मान्य केली आहे, सरनाईक यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही खुद्दार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
२ महाराष्ट्रात भाजप आणि ईडीचे सरकार तर मुख्यमंत्री कंत्राटी – उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई येथे एका कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘राज्यात ज्या प्रकारे मजुरांना कंत्राटावर घेतले जाते, त्याच पद्धतीने सध्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. ते किती काळ मुख्यमंत्री राहतील, हे त्यांना माहीत नाही. सध्या महाराष्ट्रात भाजप आणि ईडीचे सरकार आले आहे.’ अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला.
३ कंत्राटी मुख्यमंत्री म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा टोला
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या कंत्राटी मुख्यमंत्री टीकेचा जोरदार समाचार घेतला. हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं, राज्याला पुढे नेण्याचं कंत्राट घेतलं आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
४ शिंदे गटाच्या आमदारांकडून आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणानंतर आज देखील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. या बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवण्यात आलेलं असून, हिंदुत्वाऐवजी महाविकास आघाडीकडे प्रवास करत असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.
५ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती पत्र
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने दि. 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करीत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीने काढला असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
६ सोलापूरात आयकरचे छापे
हॉस्पिटल, डॉक्टर्स आणि कारखानदार रडारवर
सोलापुरातील सहकार क्षेत्रातील हॉस्पिटल, डॉक्टर, प्रमुख पदाधिकारी आणि कारखानदार यांच्यावर गुरुवारी सकाळी आयकर खात्याने छापे टाकले. यात पंढरपुरात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अन्य चार साखर कारखान्यांची मालकी असलेले अभिजीत पाटील यांच्यासह आणि त्यांच्या उद्योग समूहावरहीसुद्धा धाडी पडल्या आहेत. आयकर विभागाने याबाबतची कारवाई अत्यंत गुप्तता पाळून सकाळपासून सुरू केली. या सर्व संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह आयकर विभागाचे पथक दाखल झाले. अधिकृतपणे कोणतीही माहिती प्रसार माध्यमांना आयकर विभागाकडून मिळालेली नाही.
७ आर्थिक शिस्तीसाठी कॅगकडून माजी अर्थमंत्री अजित पवारांचे कौतुक
करोना महाराहीच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असताना कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केली असल्याचे राज्याच्या लेखा परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने राजकोषीय तूटदेखील तीन टक्क्यांहून करण्यास यश मिळवले असल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, राज्याचा GDP तीन टक्क्यांनी घसरला असल्याचे समोर आले आहे. कॅगने राज्याचे माजी अर्थमंत्री अजित पवार यांचे आर्थिक शिस्तीसाठी कौतुक केले आहे.
८ राहुल अथवा प्रियंका गांधी यांनीच अध्यक्ष पद स्विकारावे – प्रियांक खरगे
कॉंग्रेसच्या हंमागी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनीच नवीन कॉंग्रेस अध्यक्षांची निवड करावी अशी मागणी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी केली आहे. प्रियांक म्हणाले की या पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव घेतले जाते आहे. हे चांगले नाव आहे. मात्र राहुल गांधी अथवा प्रियंका गांधी यांनीच अध्यक्ष पद स्विकारावे अशी पक्ष कार्यकर्त्यांची मागणी आहे कारण त्यांच्या नावाला पक्षात व्यापक सहमती आहे.
९ सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा
टीकटॉक स्टार आणि भारतीय जनता पार्टीची नेता सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फोगट यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. हरियाणातील हिसार येथे राहणाऱ्या फोगट यांना गोव्यात मंगळवारी संशयास्पदपणे हृदयविकाराचा झटका आला होता त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
१० रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने
आतापर्यंत नऊ हजार सैनिक, तर 900हून अधिक बालकांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप कायम आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. हा संघर्ष संपण्याची चिन्ह अद्यापही दिसून येत नाही. रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला चढवत युद्धाला सुरुवात केली. यामध्ये युक्रेनमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनमधील हजारो नागरिक आणि सैनिक मारले गेले असून मोठा विध्वंस झाल्याचे चित्र आहे. सहा महिन्यानंतर रशियाने आता बऱ्याच भागावर ताबा मिळवला आहे.