१ आशिया करंडक टी-20 स्पर्धेत आज भारत पाकिस्तान भिडणार | Top 10 Marathi News Today
करोनामुळे गेली दोन वर्षे आयोजित न होऊ शकलेली आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा शनिवारपासून युएई येथे सुरू झाली आहे. स्पर्धेमध्ये आज परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात लढत रंगणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत – पाकिस्तान हे संघ आमने सामने येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड असून भारत या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जातोय. स्थानिक वेळेनुसार आज सायंकाळी ७.३० वाजता सामना सुरु होईल.
२ गुजरातला बदनाम करण्याचे षडयंत्र – पंतप्रधान मोदी
गुजरातला बदनाम करण्याचे आणि त्यांच्या गृहराज्यातील गुंतवणूक रोखण्याचे षड्यंत्र रचले जात आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. गुजरातला देशात आणि जगात बदनाम करण्याचे कारस्थान झाले. राज्यात येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न केले गेले, पण राज्याने प्रगतीचा नवा मार्ग निवडला. 2001 च्या कच्छच्या भूकंपानंतर, मी कच्छच्या पुनर्विकासाविषयी बोललो होतो आणि आम्ही त्यासाठी कठोर परिश्रम केले. आज तुम्ही निकालाचे साक्षीदार आहात, असे ते म्हणाले.
३ विविध सरकारे पाडण्यासाठी भाजपने खर्च केले 6 हजार 300 कोटी – केजरीवाल यांचा आरोप | Top 10 Marathi News Today
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने भाजप आणि केंद्र सरकारवरील शाब्दिक हल्लाबोल कायम ठेवला आहे. भाजपने आतापर्यंत इतर पक्षांची सरकारे पाडण्यासाठी 6 हजार 300 कोटी रूपयांचा खर्च केला असल्याचा नवा आरोप केजरीवाल यांनी केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयने काही दिवसांपूर्वी छापा टाकला. तेव्हापासून आपने भाजप आणि केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
४ गणेशोस्तवात गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर?
गृहमंत्री अमित शहा गणेशोस्तवात मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही वर्षांपासून अमित शहा गणेशोस्तवात मुंबई दौरा करीत असून कोरोनामुळे यामध्ये दोन वर्षांचा खंड पडला होता. यंदा मात्र शहा गणेशोस्तवाच्या निमित्ताने मुंबई येथे येणार असून ते भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातोय.
५ भाजपने ज्यांच्याशी युती केली त्यांची स्थिती काय आहे? | Top 10 Marathi News Today
भास्कर जाधव यांचा फडणवीसांवर पलटवार
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी अशी प्रतिक्रीया दिली होती. त्यावर आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजपनेही राज्यातील अन्य संघटनांशी युती केली आहे, पण त्यांची अवस्था त्यांनी काय केली आहे हे आपण पहातच आहोत. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना, महादेव जानकर यांची रासप आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती या संघटनांचे काय झाले आहे हे सगळ्यांनाच दिसते आहे. आम्ही मैत्रीला जागतो. संभाजी ब्रिगेडशी युती केल्याबद्दल मी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
६ बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार ही हिंदु संस्कृती आहे का?
शिवसेनेचा मोदी, शहांना सवाल
बिल्किस बानो सामुहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात जणांच्या हत्या प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अद्याप का मौन बाळगून आहेत असा सवाल शिवसेनेने केला आहे.तरूंगातून सुटेलेल्या या 11 बलात्काऱ्यांचा सत्कार ही हिंदू संस्कृती आहे का, असा सवालही शिवसेनेने केला आहे. सेनेचे मुखपत्रातील एका स्तंभात ही टिप्पणी करण्यात आली आहे. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची कारागृहातून नुकतीच सुटका करण्यात आली असून त्यांच्या उर्वरीत शिक्षेला माफी देण्यात आली आहे. आरोपी कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांचा पुष्पमाला घालून सत्कार करण्यात आला होता व त्यांना पेढेही भरवण्यात आले होते. या प्रकारावर देशभरातून टीका होत आहे.
७ मेघालयात भाजपला टाळून एनपीपी लढणार स्वबळावर | Top 10 Marathi News Today
मेघालयमधील सत्तारूढ नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पुढील वर्षीची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मित्रपक्ष असणाऱ्या भाजपलाही एनपीपी आपल्या समवेत घेणार नसल्याचे स्पष्ट झाले.
मागील निवडणुकही एनपीपीने स्वबळावर लढवली होती. त्या निवडणुकीत कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. तर, संख्याबळात एनपीपी दुसऱ्या स्थानावर राहिला. निवडणुकीनंतर एनपीपीने तातडीने भाजप आणि इतर लहान पक्षांशी आघाडी केली. त्या आघाडीने सरकार स्थापन केले. एनपीपीचे प्रमुख कोन्राड संगमा मुख्यमंत्री बनले. आता एनपीपीला मेघालयची सत्ता राखण्याचा विश्वास वाटत आहे. त्यातून स्वत: संगमा यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला.
८ अयोध्येतील राम मंदिराचे 40 टक्के काम पुर्ण
अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराचे काम 40 टक्के पुर्ण झाले आहे अशी माहिती या कामाची उभारणी करणाऱ्या ट्रस्टने दिली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, डिसेंबर 23 पासून नागरीक या मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतील. ते म्हणाले की मंदिराच्या उभारणीबरोबरच मंदिराच्या परिसरातील रस्ते आणि सुविधांच्या विकासाचे काम वेगात सुरू आहे. चंपत राय हे कारसेवक पुरम मध्येच वास्तव्याला असून ते मंदिराच्या संबंधात रोज संबंधीतांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेत असतात.
९ पाकिस्तानातील पूरातील बळींची संख्या हजाराच्यापुढे | Top 10 Marathi News Today
पाकिस्तानातील भीषण पूरामधअये मरण पावणाऱ्यांची संख्या आता एक हजाराच्यापुढे गेली आहे. तर जखमी आणि बेपत्ता होणाऱ्यांची संख्याही जून महिन्यापासून आतापर्यंत एक हजाराच्या पुढे गेली आहे. पाकिस्तानातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती दिली. गेल्या 24 तासात 119 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 71 जण जखमी झाले आहेत. यातील बलुचिस्तानात 4, गिलगीट बाल्टिस्तानात 6, खैबर पख्तुन्वा प्रांतात 31 आणि सिंध प्रांतात 76 जण मरण पावले आहेत. मृतांची एकूण संख्या आता 1,033 इतकी झाली आहे, असे आपत्ती व्यवस्तापन प्राधिकरणाने म्हटले आहे.
१० अमेरिकेकडून युक्रेनला सागरी मार्गाने मोठा शस्त्र पुरवठा
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने युक्रेनला समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे. विमानापेक्षा वेग कमी असूनही, जहाजे मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करण्यास सक्षम आहेत, या पुरवठ्यामुळे युक्रेनच्या कीव शहरात एक मोठे शस्त्रागार तयार केले जात आहे. रशियाने फेब्रुवारीच्या अखेरीस युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर पेंटागॉनने युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली, परंतु अलिकडच्या काळात ही सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.