मुंबई – विवो प्रो कबड्डी लीगचे (Pro Kabaddi League 2022) मुख्य संयोजक असलेल्या मशाल स्पोर्टस यांनी लीगच्या नवव्या मौसमाच्या तारखांची घोषणा नुकतीच मुंबई येथे केली. यंदाच्या प्रो कबड्डी लीगला 7 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. यंदाच्या लीगमधील सामने पुणे बेंगळुरू आणि हैदराबाद येथे पार पडणार आहेत.
यावेळी बोलताना मशाल स्पोर्टसच्या स्पोर्टस लीग विभागाचे प्रमुख आणि विवो प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी म्हणाले की, कबड्डीसारखा अस्सल भारतीय खेळ सध्याच्या आधुनिक जगातील आणि आगामी भविष्यातील युवा क्रीडाप्रेमींपर्यंत पोहोचविण्याच्या दूरदृष्टीतून मशाल स्पोर्टस यांनी प्रो कबड्डी लीगच्या आयोजनाला प्रारंभ केला. आम्ही आमचे लक्ष्य साध्य करण्यात निश्चितपणे यशस्वी ठरलो. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी लीगच्या आठव्या मौसमाचे आयोजन बायोबबल किंवा जैवसुरक्षित वातावरणात अत्यंत यशस्वीरित्या करण्यात आले होते.