कोल्हापूर – शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर आज दि 25 जुलैला शिवसैनिकांचा मोर्चा निघणार आहे. धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी हा शिवसैनिकांचा मोर्चा असणार आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.
यावर धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन त्यांच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केले आहे. शिवसैनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याची माझी तयारी असल्याचे खासदार माने यांनी म्हटले आहे.
धैर्यशील माने यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमके हे का घडले? कशामुळे घडले? यासाठी त्यांचा होणार आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये.
मोर्चामध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण हा आपलेच बंधू-भगिनी आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हे त्यांचा सहकारी म्हणून माझे कर्तव्य असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.
सध्या संसदेचं अधिवेशन असल्यामुळं मी दिल्लीमध्ये आहे. मतदारसंघात परत येईपर्यंत संयम राखून मतभेद होणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मोर्चाला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार किंवा प्रतिवाद होता कामा नये. तसेच प्रशासनाननेही मोर्चाला सहकार्य करावे ही विनंती असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.