किव्ह – काळ्या समुद्रातील युक्रेनचे बंदर ओडेसाच्या केवळ लष्करी तळाला क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याचा दावा रशियाने केला आहे. दोन्ही देशांदरम्यान धान्य वितरणासाठीच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर लगेचच रशियाने केलेल्या या हल्ल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त व्हायला लागल्यामुळे रशियाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे या लष्करी तळावरील युद्धनौकांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात एक युद्धनौका बुडाल्याचे समजते आहे. अमेरिकेने दिलेली हार्पून जहाजभेदी क्षेपणास्त्रे असलेल्या गोदामाचेही नुकसान झाले आहे, असे रशियाच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे.
रशियाच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे रशियाबरोबरच्या चर्चेची शक्यताच नष्ट झाल्याचे युक्रेनचे ध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी शनिवारी रात्री देशवासियांना उद्देसून टिव्हीवरून दिलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
रशियाने ओडेसा बंदरावर चार क्रूझ क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी दोन क्षेपणास्त्रे युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाडली होती, असे युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे.
या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये धान्याच्या कोणत्याही कोठाराचे नुकसान झालेले नाही. मात्र गुरांचाठीचा चारा साठवण्याच्या कोठाराचे नुकसान झाल्याचे तुर्कीच्या अधिकारयांनी युक्रेनच्या हवाल्याने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे धान्य वितरणाच्या प्रक्रियेवर किती परिणाम होईल, हे मात्र युक्रेनकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.