नवी दिल्ली – करोनामुळे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेला एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता पुन्हा पात्रता स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. आधी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे रॅंकिंग कायम राहणार असले तरी नव्याने जवळपास 20 पात्रता स्पर्धा होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने जाहीर केले आहे.
यंदा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली असून नव्या वेळापत्रकानूसार ही स्पर्धा आता पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेला आता जवळपास एक वर्षाचा कालावधी असल्याने करोनाचा धोका येत्या काळात कमी झाला तर विविध क्रीडा प्रकाराच्या पात्रता स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असे संघटनेने जाहीर केले आहे.