टोकियो – जागतिक क्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची समजली जात असलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रविवारी संपन्न झाली. या स्पर्धेचा समारोप सोहळाही उद्घाटन सोहळ्यासारखाच दृष्ट लागण्यासारखा पार पडला.
भारतीय पथकाचे नेतृत्व पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया व सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी केले. बाय बाय टोकियो… आता पॅरिसमध्ये भेटू, असा संदेश देत संयोजन समितीने या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे, जपानच्या नागरिकांचे, माध्यमांचे, प्रायोजकांचे तसेच स्पर्धेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सगळ्यांचे आभार मानले. या सोहळ्याला प्रेक्षकांना परवानगी दिली गेली नसली तरीही खेळाडूंसह स्पर्धेशी निगडीत सर्वांना सुट देण्यात आली होती.
भारतीय पथकातील खेळाडूंसह विविध पदाधिकारी व सपोर्ट स्टाफमधील सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते. फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीने टोकियोतील ऑलिम्पिक स्टेडियमचा परिसर झगमगून गेला होता. संपूर्ण टोकियो शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा जागतिक क्रीडा कुंभमेळा गेले 17 दिवस कोणत्याही संकटाशिवाय पार पडला.
करोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. त्याचे संपूर्ण श्रेय संयोजकांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व अध्यक्ष थॉमस बाख, जपान ऑलिम्पिक समिती, विविध देशांच्या ऑलिम्पिक संघटना, जपानचे नागरिक, माध्यमे व त्यांचे प्रतिनिधी, प्रायोजक यांच्यासह सगळ्यांनाच दिले. 2020 साली होणारी ही स्पर्धा करोनाच्या संकटामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. आता पुढील ऑलिम्पिक स्पर्धा 2024 साली पॅरिसमध्ये होणार असून त्यासाठी सर्व सहभागी देशांच्या खेळाडूंना संयोजन समितीने शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व देशांच्या ध्वजवाहकांचे स्वागत खास जपानी पद्धतीने करण्यात आले. यावेळी स्थानिक कलाकारांनी आपली अदाकारी सादर केली. या कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत स्पर्धेचे यशस्वी व सुरक्षित आयोजन केल्याबद्दल संयोजन समिती व जपान सरकार आणि नागरिकांचे आभारही मानण्यात आले.
पॅरालिम्पिक स्पर्धाही रंगणार
मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता पॅरालिम्पिक स्पर्धाही अशाच यशस्वी पद्धतीने रंगणार असल्याचा विश्वास जपान ऑलिम्पिक समितीने व्यक्त केला आहे. ही स्पर्धा येत्या 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठीही देश सज्ज असल्याचेही समितीने यावेळी सांगितले.