पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिल्या आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना आपला दस्त कोणत्या वेळी नोंदणी होणार आहे, याची पूर्वकल्पना मिळणार असल्यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच कामकाजाविषयीची अनिश्चितता, गैरसमज, निर्माण होणारे वाद कमी होणार आहेत.
शहरातील प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज सरासरी 40 ते 50 दस्तऐवज नोंदणीसाठी येतात. यासाठी पक्षकार, वकिल आदींसह 200 ते 300 नागरिक कार्यालयांमध्ये येत असतात. दस्त नोंदणीशिवाय मूल्याकंन, शोध, प्रमाणित प्रती आदी कामांसाठी नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येत असतात. या सर्व नागरिकांना दस्त नोंदणी व इतर सेवा सुलभपणे मिळाव्यात यासाठी विभागाने 2002 पासून टोकन पद्धत आणली आहे. मात्र तिची अंमलबजावणी होत नव्हती. आता ही योजना प्रायोगिक तत्वावर दि. 15 जुलै 2023 ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान राबविण्यात येणार असल्याचे हिंगाणे यांनी सांगितले.
दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरील ई-स्टेप-इन सुविधेद्वारे ऑनलाइन टोकन बुकींगची सुविधा उपलब्ध आहे. ज्या नागरिकांनी ऑनलाइन टोकन बुकिंग केलेले नाही, त्या पक्षकारांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जावून दस्ताचे मुद्रांक शुल्क, नोंदणी फी भरलेली पावती दाखवून टोकन घेणे आवश्यक राहील, असे नोंदणी विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
टोकन पद्धतीचे फायदे…
- दस्त नोंदणी करण्याच्या कामात शिस्तबद्धता
- नागरिकांना नोंदणीसाठी दस्त किती वाजता स्वीकारला जाईल, याचीपूर्व कल्पना मिळणार
- दस्त नोंदणीसाठी दिलेल्या वेळेच्या सुमारे 15 मिनिटे आधी उपस्थित राहणे आवश्यक
- नोंदणीसाठी नागरिकांना विनाकारण थांबून रहावे लागत नाही
- कार्यालयातील गर्दी कमी होणार तसेच वेळेची बचत होणार