– पवनेच्या पाण्याने केला स्पर्श
– मार्ग वाहतुकीसाठी होणार बंद
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी पवनेच्या पुराने थैमान घातले आहे. नदीपात्रालगतच्या नागरी वस्तीमध्ये पाण्यात वाढ होत असून थेरगावातील बिर्ला रुग्णालयासमोरील पुलाला पवनेच्या पाण्याने स्पर्श केला आहे. धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने पुलावरुन पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या पिंपरी-चिंचवड शहरातून वाहतात. या नद्यांवर असलेली धरणे पूर्णतः भरलेली असून त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यातच धरण साखळीमध्ये व शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना पूर आला आहे. नद्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी शहरातील अनेक परिसरात गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. वाहतूक विभागाकडून अनेक रस्ते, चौक, पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. पिंपरी महापालिकेकडून ठिकठिकाणी नऊ बचाव छावण्या उभारण्यात आला आहेत. पुरबधित परिसरातील नागरिकांचे या बचाव छावण्यांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात येत आहे. या नऊ बचाव छावण्यांमध्ये तीन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याचबरोबर पुरबधित क्षेत्रात निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध असणा-या पाच हजार नागरिकांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.