खळद वार्ताहर – खळद( ता पुरंदर) येथील वृद्ध महिला नदीपात्रात सकाळी 10 वाजता कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाय घसरल्याने नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. या वेळी त्यांच्या बाजूला असलेल्या महिलांनी त्याना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना अपयश आले,अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितली आहे. वाहून गेलेल्या वृध्द महिलेचे नाव कौशल्या चंद्रकांत खळदकर असे आहे.
गावातील स्थानिक युवकाकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध घेण्यास अडचण येत असून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण केले असल्याचे सासवड पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
तर माझ्या आईचा शोध कसा लागणार..? प्रत्येक जण येऊन फक्त पाहून जात आहे. दोन तास झाले असून अद्याप शोध कार्य सुरू झाले नसल्याने वृद्ध महिलेच्या मुलाने हतबल होऊन प्रश्न केला आहे.