डेहराडून- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यात पुढील पाच वर्षांत मॉडेल राज्य म्हणून उत्तराखंडला विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
“व्हिजन डॉक्युमेंट, 2022′ असे नाव असलेल्या या निवडणूक जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटन क्षेत्रांचा विकास, राज्यातील स्थलांतर थांबवणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे, महिलांचे सक्षमीकरण, शेतकरी, फलोत्पादन आणि दुग्धव्यवसाय विकासावर नव्याने भर देण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यात नैतिकता, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि पर्यावरण अशा महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला आहे, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी आणि राज्यसभा खासदार नरेश बन्सल व्यासपीठावर उपस्थित होते.