नवी दिल्ली – लडाखमध्ये भारत-चीन हिंसाचारात २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यातच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. याचा मोठा झटका चीनच्या स्मार्टफोन कंपनी ओप्पोला बसला आहे. ओप्पोला भारतातील फोनचा लाइव्ह लाँच इव्हेंट रद्द करावा लागला आहे.
Oppo Find X2 स्मार्टफोन आज संध्याकाळी 4 वाजता एका ऑनलाइन ओन्ली इव्हेंटमध्ये भारतात लाँच केला जाणार होता. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग युट्युबवरही होणार होते. मात्र, ही युट्युब लिंक गायब झाली आहे. आणि केवळ एक २० मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करत Oppo Find X2 फोन लॉन्च केल्याची घोषणा केली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओप्पोने कशाप्रकारे भारतात मदत केली हेदेखील या व्हिडिओमध्ये कंपनीने दाखवले आहे.
दरम्यान, लाइव्ह लाँचिंगऐवजी केवळ व्हिडिओ का अपलोड करण्यात आला. याबाबत वृत्तसंस्था Reutersने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यावर ओप्पोकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.