तिरुपती बालाजी मंदिरालाही कोरोनाचा फटका ;1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले

हैदराबाद : लॉकडाऊनचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रावर पडला आहे. त्यातच देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरालाही या कोरोनाचा फटका बसला आहे.  मंदिरात काम करणाऱ्या 1300 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांचे कंत्राट 30 एप्रिल रोजी संपले होते. मात्र मंदिर प्रशासनाने 1 मेपासून त्यांचे कंत्राट रिन्यू करण्यास नकार दिला.

तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने 1300 कंत्राटी कर्मचाऱ्यांना 1 मेपासून कामावर येऊ नका असे सांगितले. लॉकडाऊनमुळे काम बंद आहे, त्यामुळे आता या 1300 कर्मचाऱ्याचे कंत्राट 30 एप्रिलपासून पुढे वाढवणार नसल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टकडून तीन गेस्ट हाऊस चालवले जातात. विष्णु निवासम, श्रीनिवासम आणि माधवम अशी या तीन गेस्ट हाऊसची नावे आहेत. नोकरीवरुन कमी करण्यात आलेले सर्व 1300 कर्मचारी याच गेस्ट हाऊसमध्ये अनेक वर्षांपासून काम करत होते. दरम्यान, मंदिर प्रशासनाने कामावरुन काढल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी तिरुपतीमधील विश्वस्तांच्या कार्यालयासमोर निदर्शनेही केली.

बालाजी मंदिराचे अध्यक्ष वाय.वी.सुब्बा रेड्डी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे सर्व गेस्ट हाऊस बंद आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कंत्राट पुढे वाढवले नाही. सोबतच कायम असलेल्या कर्मचाऱ्यांकडेही या दरम्यान कोणतेही काम सोपवलेले नाही. सर्व निर्णय कायदेशीररित्यातच घेतले आहेत. काम बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे प्रवक्ता टी रवी यांनी दिली.

कोरोना व्हायरसमुळे तिरुपती बालाजी मंदिर 20 मार्चपासून बंद आहे. पण मंदिरातील दैनिक पूजा, आराती पुजाऱ्यांमार्फत सुरु आहे. सध्याच्या आर्थिक वर्षासाठी या मंदिराचे बजेट 3,309 कोटी रुपये आहे. केंद्र सरकारने सर्व कंपन्या, मालकांना निर्देश दिले होते की, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेषत: कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढू नये. सोबतच त्यांच्या वेतनात कपात करुन नये, असेही म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.