बेल्हे (वार्ताहर) – आळेफाटा (ता.जुन्नर) येथे, रहिवासी असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास होऊ लागल्याने संशयित कोरोना रुग्ण म्हणून, शनिवार (दि. ९) रोजी पुणे येथील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुणे नायडू रुग्णालयात बदली झाल्यानंतर तेथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या आळेफाटा येथे असलेल्या निवासस्थानी चार दिवसांपूर्वी आले होते. त्यांना सर्दी आणि खोकलाचा त्रास होऊ लागल्या नंतर आळेफाटा येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील लॅब व सोनोग्राफी सेंटरमध्ये त्यांच्या तपासणी करण्यात आली होती.
तरीही त्रास कमी होत नसल्याने त्यांना आळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काही तपासणी करून जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील नायडू रुग्णालयात संशयित करोना रुग्ण म्हणून तपासणीसाठी हलविण्यात आले होते. संबंधित रुग्णाच्या २ वेळा तपासणी केल्या असून सुदैवाने अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे व आळे गावचे तलाठी आर.सी. वामन यांनी दिली. त्यामुळे आता जुन्नरकरांना गेल्या दोन दिवसांपासून असणारी चिंता मिटली आहे.
डॉ. उमेश गोडे, आरोग्य अधिकारी ,जुन्नर
“आळेफाटा येथील करोना संशयित रुग्णाला २ दिवसांपूर्वी पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवलं होत.त्यांच्या २ तपासण्या करण्यात आल्या असून तपासणी अहवाल सोमवार (दि. ११) रोजी सकाळी मिळाला असून दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तरीही खबरदारी म्हणून त्यांना पुढचे काही दिवस होम कोरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”