Tipu Sultan : कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या एका आमदाराने कर्नाटकातील विमानतळांची नावे बदलण्याचा प्रस्ताव दिला. जो सर्वसंमतीने मान्य करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळेच काँग्रेस आणि भाजपा यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. कारण मैसूर विमानतळाला टीपू सुलतान विमानतळ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हुबळी विमानतळाचे नाव क्रांतिवरी संगोली रायन्ना, बेळगाव विमानतळाचं नाव कित्तूर राणी चेन्नमा, शिवमोगा विमानतळाचं नाव डॉ. के. व्ही पुट्टप्पा विमानतळ, अशी नावे देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्यानंतर हुबळीचे काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांनी मैसूर विमानतळाचे नाव टीपू सुलतान विमानतळ ठेवण्यात यावे असा प्रस्ताव मांडतो असे म्हटले आहे. ज्यानंतर भाजपाने काँग्रेसचा निषेध नोंदवत निदर्शने केली.
कर्नाटकात टीपू सुलतानच्या नावाचा वाद हा काही नवीन नाही. हा वाद आता या नव्या मागणीमुळे पुन्हा सुरु झाला आहे. १० नोव्हेंबर २०१६ या दिवशी हा वाद सुरु झाला होता. कारण त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसने टीपू सुलतानची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. कर्नाटक भाजपा आणि महाराष्ट्रातून या नावाला विरोध झाला. मतांच्या लांगुलचालनासाठी काँग्रेसने ही खेळी खेळल्याचा दावा त्यावेळी भाजपाने केला होता. यानंतर याच वर्षी जून महिन्यात टीपू सुलतान आणि औरंगजेब यांच्यावरुन व्हायरल झालेल्या पोस्टचा उल्लेख करत निदर्शने केली होती.
कर्नाटकची विधानसभा निवडणूक याच वर्षी पार पडली. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. मात्र निवडणूक प्रचाराच्या वेळी राज्य भाजपाचे प्रमुख नलिन कातील यांनी हा मुद्दा पुढे केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही टीपू सुलतानची वाहवा गाणारे लोक तु्म्हाला हवे आहेत का ?असा प्रश्न कर्नाटकच्या जनतेला भाषणांतून विचारला होता.