काबुल – अफगाणिस्तानमध्ये काही महिन्यापूर्वी तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर देशाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे दररोज जगायचे कसे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पोटापाण्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आता अनेकांना आपल्या पोटच्या पोरांना बाजारात नेऊन विकण्याची वेळ आली आहे. एखाद्या घरात जर खाणारी जास्त तोंडे असतील तर त्या घरातील एखादी मुलगी विवाहाच्या निमित्ताने विकून त्या पैशातून इतरांची पोट भरण्याचे काम आता अफगाणिस्तानमधील अनेक कुटुंबे करत आहेत.
अफगाणिस्तानमध्ये स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी आलेल्या वर्ल्ड व्हिजन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक असंथा चार्ल्स यांनी याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक कुटुंबांना आपल्या घरातील एखाद्या मुलाला बाजारात नेऊन विकावे लागत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम अफगाणिस्तानमध्ये युद्धग्रस्त लोकांसाठी एक कॅम्प उभारण्यात आला आहे या कॅम्पमध्ये अक्षरशा मुलांच्या खरेदी-विक्रीचा बाजार जोरात चालू आहे. अफगाणिस्तानमध्ये कमी वयातील मुलींचे विवाह ही जरी सर्वसाधारण बाब असली तरी आता केवळ पैशाच्या मोहाने दहा वर्षाच्या मुलींचेही विवाह केले जात आहेत.
म्हणजेच एक प्रकारे या मुलींची विक्री केली जात आहे. अशा कुटुंबातील माता नेहमीच अशा प्रकारच्या विवाहाला म्हणजेच मुलींच्या विक्रीला विरोध करत असतात पण अफगाणिस्तानमध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे घरातील महिलांच्या विरोधाला कोणीच किंमत देत नाही युध्द ग्रस्तासाठी उभारण्यात आलेल्या सेंदाई नावाच्या कॅम्पमध्ये गुल नावाची एक महिला अशाप्रकारे आपल्या दहा वर्षाच्या मुलीचा व्यवहार होऊ नये यासाठी सध्या धडपडत आहे.
पण घरात आणखी चार मुले असल्यामुळे त्यांचे पोट भरण्यासाठी मला या मुलीचे लग्न पैसे देऊन करावेच लागेल असे या घरातील पित्याचे मत आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना सध्या युद्धग्रस्त लोकांच्या कॅम्पमध्ये घडत आहेत. खराब अर्थव्यवस्थेमुळे नवनवीन रोजगार निर्माण होत नाहीत आणि तालिबान्यांच्या जुलुमी राजवटीखाली नोकरी करणेही शक्य नसल्याने केवळ पोट भरण्याचे काम करण्यासाठी अनेक सर्वसामान्य नागरिकांवर आता घरातील लहान मुलांवर मुलांना बाजारात विकण्याची वेळ आली आहे.