सुपे – गेल्या वर्षीच्या टाळेबंदीचा फटका हॉटेल व्यावसायिक सहन करू शकले नाहीत. वेळेच्या निर्बंधानंतर शनिवार, रविवार केवळ पार्सल सेवा सुरू असल्याने दोन मुख्य दिवशीच हॉटेलमध्ये बसून ग्राहकांना जेवण करता येत नसल्याने मोरगाव-जेजुरी मार्गावरील काही हॉटेलला टाळे लागतील. त्यामुळे शनिवार, रविवारीही हॉटेल पूर्ण क्षमतेने उघडी द्यावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
मोरगाव-जेजुरी हा वर्दळीचा मार्ग आहे. मोरगावचा मयुरेश्वर, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी असते; परंतु गेल्या वर्षीपासून करोनाच्या संकटामुळे धार्मिक स्थळे बंद असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडला आहे.
तर हॉटेल व्यवसायावर अनेक उद्योग उदा. किराणा, बेकरी तसेच कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न अवलंबून असून या करोनामुळे त्यांच्यावरही गदा आली आहे. दरम्यान, हॉटेल व्यवसाय सुरू करायला शासनाने जरी मान्यता दिली असली तरी करोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे लोक हॉटेलमधील खाणे शक्यतो टाळतात.
सुपा-मोरगाव-जेजुरी या रस्त्यावरील दोन्ही बाजूला अनेक हॉटेल आहेत. काहींची जागा स्वतःची तर काहींची जागा भाडेतत्त्वावर आहे. काहींनी मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली आहे; परंतु करोनापुढे सगळेच व्यावसायिक हतबल झाले आहेत. लवकरच पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण व्हावी अशी सर्व हॉटेल व्यावसायिकांची अपेक्षा आहे.
कामगारांवर उपासमारीची वेळ
हॉटेलमध्ये काम करणारे बाहेरील गावांतील लोक कामावर येण्यासाठी अनेक व्यावसायिकांशी संपर्क साधतात; परंतु पूर्वी सारखा व्यवसाय न राहिल्याने व्यावसायिकही हतबल झाले आहेत, यामुळे त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
करोनामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिकांचे पूर्णपणे कंबरड मोडल आहे. व्यवसायात पूर्वी सारखी परिस्थिती आता राहिली नाही. शासनाने दिलेल्या नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत आहोत.
– सागर भोंडवे, हॉटेल गुरुकृपा, मोरगाव-सुपे रस्ता
फक्त पार्सल सेवा असल्यामुळे पूर्वी सारखा व्यवसाय आता राहिला नाही. करोना नष्ट होऊन लवकरात लवकर हॉटेल व्यावसायिकांवर चांगले दिवस यावेत ही आम्हा सर्व हॉटेल व्यावसायिकांची अपेक्षा आहे.
– कल्याण राजपुरे, हॉटेल कल्परंजन, मोरगाव-सुपे रस्ता