पारनेर – तहसीलच्या पथकाने ताब्यात घेतलेला जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील विश्रामगृहातून पळून नेणाऱ्या टायगर शेख याला पारनेर पोलिसांनी वनकुटे येथे अटक केली. तहसीलच्या पथकाने वनकुटे परिसरातून दि. 13 नोव्हेंबर रोजी जेसीबीच्या साह्याने विनापरवाना शासकीय गौण खनिजाचे उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करत असताना आढळून आला. त्यावरून तहसील कार्यालयाने जेसीबी ताब्यात घेवून तो टाकळी ढोकेश्वर येथील विश्रामगृहात ठेवण्यात आला होता.
परंतु आरोपी टायगर शेख यांनी रात्रीचा फायदा घेत विश्रामगृहातील सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत जेसीबी पळून नेला. त्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व महसूलच्या पथकास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी वनकुटे येथून टायगर शेखला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, मात्र जेसीबी अद्याप आढळून आलेला नाही. शेख यास न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.
वनकुटे पळशी मांडवा या परिसरामध्ये नेहमीच वाळूतस्करांची दहशत राहिली आहे. पोलीस व महसूल यांच्यावतीने वेळोवेळी धडक कारवाया करण्यात आल्या. परंतु अद्याप या वाळू तस्करांना आळा बसला नसून दिवसेंदिवस त्यांची दहशत वाढत आहे. कारवाई केलेल्या पथकांना देखील हे वाळूमाफिया जुमानत नसून त्यांच्यावर देखील हल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे या वाळूतस्करां विरोधात ठोस पावले, उचलावी असे नागरिकांची मागणी आहे.