नगर – रामवाडी झोपडपट्टीत सार्वजनिक शौचालया जवळील रस्त्यावर रात्रीतून उभे करण्यात आलेले पत्र्याचे अनधिकृत शेडचे अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी नागरिकांनी पालिकेत आयुक्तांचा दालनात ठिय्या दिला. लॅन्ड माफिया जागा बळकाविण्याचा प्रयत्न करीत असून दहशद निर्माण करण्याच प्रयत्न होत आहे. त्याचा निषेध म्हणून परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला.
यावेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत त्यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, विकास उडाणशिवे, सोमनाथ लोखंडे, अनिल पाथरे, नितीन साबळे, सुभाष दिवटे, गंगाराम शेलकर, अक्षय केंजरला, बंटी साबळे, राजू दिवटे, पप्पू पाटील, विनोद घोरपडे, अनिल वाघचौरे, विक्रम पठारे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रामवाडी झोपडपट्टी मध्ये सार्वजनिक शौचलया समोर 40 ते 50 वर्षांपासून कचराकुंडी आहे. महापालिकेच्या वतीने येथील कचरा देखील नियमित संकलित केला जातो. या भागातील रस्त्यावरुन नागरिक मार्गक्रमण करीत असतात. लॅन्ड माफियांच्या सांगण्यावरुन काही गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांनी या ठिकाणची कचरा कुंडी हटवून त्या ठिकाणची जागा बेकायदेशीरपणे बळकाविण्याचा प्रयत्न चालवला आहे. या ठिकाणी रात्रीतून पत्र्याचे शेड उभारण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रामवाडी झोपडपट्टीत 800 ते 900 कुटुंबीय आहेत. गुंडप्रवृत्तीचे लोक पत्र्याचे शेड उभारत असताना महिलांना या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयात देखील जाण्यास घाबरत आहे. त्या अतिक्रमणाने रस्ता, कचराकुंडी व सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने अनाधिकृत अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी रामवाडी येथील नागरिकांमधून करण्यात आली.