हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील (hingoli News) सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी पीक कर्ज फेडण्यासाठी चक्क आपले अवयव विक्रीला काढले आहेत. यामध्ये किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार तर डोळे 25 हजार रुपये प्रमाणे विक्रीचा दर ठरविला आहे. त्यांनी या संदर्भात थेट शासनाला निवेदन पाठवून अवयव खरेदी करण्याची विनंती केली आहे. (Farmers to sell organs)
हिंगोली जिल्हयात यावर्षी विस्कळीत स्वरुपाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचा लागवडीचा खर्च निघाला नाही. तर इतर पिके हातची गेली आहेत. या परिस्थितीत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिवाय जो काही शेतीमाल हाती आला त्याला बाजारपेठेत भाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली आहे. (hingoli Farmer)
यावर्षी खरीप हंगामातील पिके हाती आली नसल्याने पीक कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे पीक कर्ज फेडण्यासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, माझोड, केंद्रा बुद्रुक व ताकतोडा येथील 10 शेतकऱ्यांनी अवयव विक्रीसाठी काढले आहेत. या संदर्भात शेतकरी गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे (रा. गोरेगाव), दशरथ मुळे, संजय मुळे (रा. माझोड), गजानन जाधव, धिरज मापारी (रा. केंद्रा बुद्रुक), नामदेव पतंगे (रा. ताकतोड) यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या नावे पत्र लिहीत शासन दरबारी ही मागणी केली आहे.
यावर्षी सोयाबीनचे पिक येलोमोझॅक मुळे हाती आले नाही तर कापसावर लाल्या रोग पडल्याने नुकसान झाले. त्यामुळे पीक कर्ज कसे भरावे असा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने आमचे अवयव खरेदी करून पीक कर्जाची परतफेड करावी असे या निवेदनात नमुद केले आहे. सेनगाव तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे निवेदन पाठविले आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.