Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीतून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नाव वगळावे लागणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे निवडणूक लढविणाऱ्या पक्षाचे सदस्य असायला हवेत, असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. या पत्रामुळे भाजपबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळावी लागणार आहेत.
भाजपच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी 26 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून 40 नेत्यांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (रिपाइं) आदींच्या नावांचा समावेश होता. मात्र, प्रचारकांच्या यादीतील अन्य पक्षांच्या नेत्यांच्या नावाला आयोगाने आक्षेप घेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांच्या पक्षाशिवाय अन्य पक्षातील सदस्यांच्या नावाचा समावेश केलेला आहे. स्टार प्रचारक हे संबंधित पक्षाचे सदस्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही बाब सर्व पक्षांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे.
त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून ही बाब निवडणूक निरिक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, अमित शहा, नड्डा, गडकरी, आठवले, देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर आदींचा समावेश आहे.