दक्षिण आफ्रिकेत रंगणार थ्री टीम क्रिकेट लढत
सेंच्युरियन – एकदिवसीय मर्यादित षटकांचा सामना दोन संघांतच होतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेत येत्या 27 जूनला एक नव्या धाटणीचा सामना रंगणार आहे. या एकदिवसीय सामन्यात दोन नव्हे तर, तीन संघ एकाच सामन्यात खेळणार आहेत.
येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर येत्या 27 जूनला तीन संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. या सामन्यात सहभागी होत असलेल्या संघांचे नेतृत्व अनुक्रमे एबी डिव्हिलियर्स, क्वांटन डिकॉक व कागीसो रबाडा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सॉलिडॅरिटी करंडक असे या सामन्याचे नामकरण करण्यात आले आहे. या सामन्यातून मिळणारा निधी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. या सामन्यासाठी नवे नियम तयार करण्यात आले आहेत.
प्रत्येक संघात 8 खेळाडू असून सामना प्रत्येकी 36 षटकांचा राहील. त्यात 18 व्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेण्यात येइल. प्रत्येक संघ 6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटकेच फलंदाजी करेल. त्यातील पहिली 6 षटके एका संघाविरुद्ध तर, दुसरी 6 षटके दुसऱ्या संघाविरुद्ध खेळेल. संघाचे 7 गडी बाद झाले तर, संघातील नाबाद राहिलेला फलंदाज फलंदाजीसाठी येऊ शकेल. मात्र, त्याने काढलेल्या एकेरी धावाच गणल्या जातील व दुहेरी धावांची गणती होणार नाही. गोलंदाजी करणारे दोन्ही संघ नवा चेंडू वापरतील. एका गोलंदाजाला केवळ 3 षटकेच गोलंदाजी करता येणार आहे. या सामन्यात जो संघ सर्वाधिक धावा करेल तो विजेता ठरेल.
विजेत्या खेळाडू सामन्याचे प्रतीक म्हणून पदक देण्यात येणार आहे. विजेत्याला सुवर्ण, उपविजेत्याला रजत तर, तृतीय क्रमांकाच्या संघाला ब्रॉंझ पदक देण्यात येणार आहे. सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हरचा अवलंब केला जाणार असून तीनही संघांमध्ये ही लढत टाय झाली तर तीनही संघांना मिळून संयुक्तपणे सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
थेट प्रक्षेपण होणार …
या सामन्यासाठी करोनाच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नसून स्थिनिक वाहिनीवरून सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ तसेच त्यांच्याशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांच्या प्रतिनिधीना उपस्थित राहता येणार असून तीनही संघाचे खेळाडू व सपोर्ट स्टाफला सरकारने दिलेले करोनानिरुद्धचे सर्व उपाय वापरण्याचे बंधन राहणार आहे. या सामन्यात सुरक्षेचा उपाय म्हणून चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नसून खेळाडूंनाही हस्तांदोलन तसेच एकत्रित जल्लोष करता येणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.