वडगाव मावळ (प्रतिनिधी): लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या आणि 50 व्यक्तींची परवानगी असताना अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने, वधूच्या चुलत्यासह हॉटेल चालकावर मावळ तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवार (दि. 19) दुपारी 12 च्या सुमारास येथील हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीट येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप घोटकर यांनी फिर्याद दिली आहे. राहुल रघुनाथ वरघडे (वय 32, रा. आर्डव, ता. मावळ) आकाश अनिल राऊत (वय 26, रा. माळीनगर, वडगाव, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव (ता. मावळ) येथील हॉटेलमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला पोलिसांकडून 50 व्यक्तींसह रीतसर परवानगी देण्यात आली होती. यासाठी पोलीस ठाण्यात अर्जही करण्यात आला होता. मात्र शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करून विवाह होत आहे का हे पाहण्यासाठी पोलीस उप निरीक्षक दिलीप देसाई व होमगार्ड अनिकेत बोऱ्हाडे आदी कर्मचाऱ्यांनी विवाहस्थळी भेट दिली.
यादरम्यान, विवाहाच्या स्थळावर नियमांची पायमल्ली करत 60 ते 70 जण लग्नास उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे ही पालन होताना पोलिसांना दिसले नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधूचे चुलते राहुल वरघडे आणि हॉटेलचे मॅनेजर आकाश अनिल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.