भिगवण/लोणी काळभोर-भिगवण (ता. इंदापूर) जवळील पोंदवाडी फाटा येथून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघांकडून दोन पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, विदयाधर निचित, दत्ता तांबे, अक्षय जावळे यांचे पथक नेमण्यात आलेले होते. त्यांनी ही कारवाई केली.
दिनांक 15 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी गुन्हे शाखेचे पथक भिगवण परिसरात रेकॉर्डवरील फरारी आरोपीचा शोध घेत असताना पथकास दोघेजण गावठी पिस्तुलाची विक्री करणेसाठी पोंदवाडी फाटा, पुणे-सोलापूर रोड लगत (ता. इंदापूर) येणार असल्याचे समजल्याने पोंदवाडी फाटा येथे सापळा रचून संशयित तिघांना पकडताना पळून जाण्याचा प्रयत्नात असणारे राजू विठ्ठल रोकडे (वय 39, रा. चिखली, मोरेवस्ती; मूळ रा. कासळवाडी ता. पाथर्डी), अमोल दादासाहेब बोराटे (वय 26, रा. चिखली, मोरेवस्ती झोपडपट्टी; मूळ रा. पिंपळगाव आळवा ता. जामखेड), रवि भाऊसाहेब चाळक (वय 21, रा. दिघी, आदर्शनगर, पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता दोन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे (बुलेटस) असा एकूण किंमत रूपये 1 लाख 400 रुपयाचां मुद्देमाल मिळून आला. तिनही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकामी भिगवण पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहेत.
यातील आरोपी राजू रोकडे व रवि चाळक हे वाळू व्यावसायिक असून भोसरी, दिघी, चिखली परिसरात त्यांचा वाळू सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. रात्रीचे वेळी वाळू व्यवसायानिमित्त फिरावे लागत असल्याने पिस्तूल विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आरोपी अमोल बोराटे हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांचेविरूद्ध पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात चिखली व अहमदनगर जिल्ह्यात जामखेड पोलीस पोलीस यापूर्वी खुनाचा प्रयत्न, आर्म ऍक्ट व खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.