आज सोडणार घरी; ६१ संशयित निगेटिव्ह तर 14 संशयित विलगीकरण कक्षात दाखल
सातारा – कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या तीन करोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील २०, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ३३, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ६, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील १ व वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील १ अशा एकूण ६१ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात १४ जणांना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.