पुणे – टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पुण्यात फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालय, तर सोलापूरमध्ये नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. ही तीनही महाविद्यालये नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहेत.
पुण्यात मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात इंदुताई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च ही महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. सोलापूर येथे जुळ्या सोलापुरातील नरसिंहनगर येथे असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकुलात गौरीताई टिळक कॉलेज ऑफ नर्सिंग सुरू करण्यात आले आहे. “टिमवि’चे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली.
फिजिओथेरपी महाविद्यालयात बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पुण्यातील आणि सोलापूर येथील नर्सिंग महाविद्यालयात बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. या तीनही महाविद्यालयातील प्रवेश “नीट’ परीक्षेद्वारे होत आहेत.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची वाटचाल शतकपूर्तीकडे सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार लोकमान्यांचे शैक्षणिक स्मारक म्हणून 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. फिजिओथेरपी आणि नर्सिंग अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रयोगशाळा आणि अन्य सोयीसुविधा नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिलेल्या या तीनही नव्या महाविद्यालयांमुळे पुण्यातील विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध झाल्याचे डॉ. टिळक यांनी नमूद केले.