पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 40वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी (दि. 6) होणार आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक डॉ. नौशाद फोर्बस, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑ. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांना सन्माननीय डी.लिट (विद्यानिधी) देऊन गौरविले जाणार आहे.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी ही माहिती दिली. शनिवारी सकाळी 10 वाजता “टिमवि’च्या मुकुंदनगर येथील संकुलात हा सोहळा होईल.
पदवीप्रदान समारंभात 20 विद्यार्थ्यांना पीएच.डी., पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1,046 विद्यार्थ्यांना, पदवी अभ्यासक्रमाच्या १,840 विद्यार्थ्यांना आणि कौशल्य विकास शाखेच्या 185 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल, असे कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी सांगितले. या समारंभात विविध शाखांमधील 22 विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक देऊन गौरव केला जाणार आहे.