श्रीगोंदा – राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप आणि कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे या दोघांनीही राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी करण्यास नकार दिल्याने अखेर उमेदवारीची माळ राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या गळ्यात पडली. शुक्रवारी (दि.4) सकाळी शेलार यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसच्या अनुराधा नागवडे तसेच भाजपचे अण्णासाहेब शेलार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुकीतील ‘ट्विस्ट’ वाढवला आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा सस्पेन्स उमेदवारी दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिला. गुरुवारी (दि.3) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी कॉंग्रेसनेते राजेंद्र नागवडे यांची भेट घेऊन उमेदवारी संदर्भात चर्चा केली, मात्र नागवडेंकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शुक्रवारी (दि. 4) सकाळी राष्ट्रवादीतर्फे घनश्याम शेलार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी कॉंग्रेस नेत्या अनुराधा नागवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कॉंग्रेसनेते राजेंद्र व अनुराधा नागवडे हे समर्थकांसह शहरातील जोधपूर मारुती चौकातून तहसील कार्यालयाकडे निघाले. तर राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आघाडीचे कार्यकर्ते आमदार राहुल जगताप यांच्या कार्यालयापासून तहसील कार्यालयाकडे निघाले. मात्र आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाकडे न जाता पुढे जाऊन नागवडेंच्या रॅलीत सहभागी होत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यामुळे काही क्षण कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले होते. कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी आज (दि.5) दुपारी दोन वाजता ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यात नागवडे आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. खा. सुजय विखे यांच्याबरोबर भाजपवासी झालेल्या अण्णासाहेब शेलार यांनी देखील शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील ‘ट्विस्ट’ वाढला असून कॉंग्रेस आघाडी आणि भाजप युती या दोन्ही बाजूनी बंडखोरी होणार की काय अशी परिस्थिती श्रीगोंद्यात निर्माण झाली.