आयटीआयसाठी सव्वातीन लाख अर्ज; प्रवेशासाठी रस्सीखेच

पुणे – शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली. यावर्षी आयटीआय प्रवेशासाठी 3 लाख 68 हजार 971 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील 3 लाख 22 हजार 621 विद्यार्थ्यांनी पूर्णपणे अर्ज भरला आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली.

आयटीआय प्रवेशप्रक्रिया यंदाही ऑनलाइन पद्धतीने होत आहे. प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 3 ते 30 जून अशी देण्यात आली होती. यंदा आयटीआय प्रवेशासाठी गतवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. याउलट कौशल्यप्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी धावाधाव करावे लागत आहे. अशा परिस्थितीत आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची चिन्हे जास्त आहेत.

यावर्षी आयटीआय प्रवेशासाठी 1 लाख 37 हजार 300 एवढी प्रवेशाची क्षमता आहे. मात्र, अर्जाची संख्या 3 लाख 22 हजार एवढी आहे. त्यावरून आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल लक्षात येत आहे. यंदा 2 लाख 42 हजार 664 विद्यार्थ्यांनी अर्ज “कन्फर्म’ केला आहे. तसेच, 2 लाख 14 हजार विद्यार्थ्यांनी पर्याय निवडले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.