बाहेर न पडण्याच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
शिरूर -शहरात दोन दुबई व एक जण इंग्लडवरून आलेले होते, त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तरी सुद्धा त्यांनी बाहेर पडू नये असा सूचना देण्यात आल्याचे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
शिरूर नगर परिषदेच्या वतीने करोना व्हायरस आजार व त्याचा प्रादुर्भाव होऊ नये त्याबद्दल काय उपाययोजना कराव्यात यासाठी शिरूर नगर परिषद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन व इतर कार्यालयाचे अधिकारी यांची बैठक बोलावली होती.
यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेशकुमार रोकडे, आरोग्य खात्याचे डॉ. तुषार पाटील, डॉ. मंगेश ननावरे, डॉ. आदित्य साबळे, पोलीस अधिकारी भगवान पालवे, लक्ष्मण पठारे, नगरसेवक विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी, नगरसेविका मनीषा कालेवार, रोहिणी बनकर, उज्वला वारे, पूजा जाधव, ज्योती लोखंडे, सुनिता कुरुंदळे, सुरेखा शितोळे, रेश्मा लोखंडे यांसह नगरसेविका उपस्थित होते.
डॉ. तुषार पाटील म्हणाले शासनाच्या सूचनेनुसार शहरातील तीन सार्वजनिक उद्याने, शाळा महाविद्यालये जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत. शहरात दर शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाऱ ही बंद ठेवण्यात येणार आहे. करोनोचा पार्श्वभूमीवर शहरात वॉर्डनिहाय नोडल आधिकारी नेमण्यात आले आहेत.
त्याचबरोबर औषध पावडरची फवारणी दोन दिवसांपासून करण्यात येत आहे. करोनोच्या पार्श्वभूमीवर शहरातील डॉक्टर, केमिस्ट दुकानदार, नगराध्यक्ष व शासकिय अधिकारी यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर अपडेट घेतली जात आहे.