पुणे : पुण्यात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात या तिघांवर उपचार सुरु होते. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांमधील एका महिलेचे वय ६४ असून दुसऱ्या महिलेचे वय ४८ वर्ष आहे. तर पुरुषाचे वय ३८ वर्ष आहे.
तिन्ही रुग्णांना इतर व्याधीचांही त्रास होता. ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू रविवारी रात्री ९.३० वाजता झाला. तर इतर दोघांचा मृत्यू सोमवारी झाला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. यासोबत पुण्यातील करोनाबाधितांची संख्या १ हजार ३१९ झाली असून मृतांची संख्या ८० झाली आहे.
पुण्यात रविवारी दिवसभरात ७२ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. यामुळे पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ११३९ इतकी झाली. राज्यात सध्या करोनाचे एकूण ८०६८ रुग्ण आहेत. रविवारी करोनाचे ४४० नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण ११८८ रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.