पुणे – करोनाला लढा देण्यासाठी शासकीय यंत्रणा, वैद्यकीय कर्मचारी, पोलिसांच्या बरोबरीने रेल्वेदेखील युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वैद्यकीय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दिवसरात्र वाहतूक रेल्वेकडून सुरू आहे. सातत्याने धावणारी रेल्वे देशवासियांसाठी आरोग्यदायिनी ठरत असून, येत्या काळात मध्य रेल्वेकडून वैद्यकीय साधनांची निर्मिती करण्यात येणार आहे.
रेल्वेकडून लॉकडाउनच्या काळात प्रवासी वाहतुकीला स्थगिती देण्यात आली आहे. मालगाड्यांतून अन्नधान्य, फळे, कोळसा, सीमेंट, पेट्रोलियम पदार्थांसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या विभागांतून देशभरात वैद्यकीय साधनांची वाहतूक केली आहे. याद्वारे औषधे, मास्क, रुग्णालयातील वस्तू आणि वैद्यकीय उपकरणे विविध भागांमध्ये पोहोचवली आहेत. रेल्वेगाड्यांचे रूपांतर विलगीकरण कक्षात केले आहे.
मध्य रेल्वेनेदेखील आतापर्यंत 482 बोगींमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले असून, रेल्वे वर्कशॉपमध्ये सुमारे 50 ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉलिची निर्मिती केली आहे. मध्य रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरसाठी हे वापरण्यात येणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
पीपीई किटची निर्मिती लवकरच
रेल्वेकडून येत्या काळात डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी आवश्यक असणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा साधन (पीपीई) किटची निर्मिती करण्यात येणार आहे. बाजारापेक्षा जवळपास निम्म्या किमतीत हे कीट तयार होणार आहेत. रेल्वेकडून सुमारे दीड लाख किट तयार करण्यात येणार असून, त्यापैकी 25 हजार तयार करण्याचे मध्य रेल्वेचे उद्दिष्ट आहे. या किटची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मार्गदर्शक तत्वे आणि मानकांनुसार होणार असून, त्याला संस्थेकडून मान्यता मिळाली आहे. हे किट मुंबईतील परेल आणि माटुंगा येथील कारखान्यात तयार करण्यात येणार आहेत.