वडगाव मावळ – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बऊर गावच्या हद्दीत ट्रकचालकाला मारहाण करून लुटमार करणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
शुभम दत्ता होजगे (वय 20), धिरजी लहू कडू (वय 18), प्रथमेश जितेंद्र कालेकर (वय 18, सर्व रा. पवनानगर, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत गौतम रंगनाथ अवधूत (वय 53, रा. विमाननगर, पुणे) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालक गौतम हे द्रुतगती महामार्गावरुन ट्रक घेऊन जात होते. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास मुंबई लेनवरून जात असताना ट्रक अडवून काचेवर दगड मारून चालकाला मारहाण केली.
ट्रकचालकाचा मुलगा गौरव याला मारून 4 हजार 500 रुपये रोख, 8 हजार 500 रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 13 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास करून गुन्हा उघडकीस आणला. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर अधीक्षक मितेश घट्टे, सहायक अधीक्षक सत्यसाई कार्तिक, निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.