पिंपरी – खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली. प्रशांत गांधी गुस्सर (वय 24, रा. देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट पाचच्या कर्मचाऱ्यांकडून देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालण्यात येत होती.
यावेळी, देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी देहूरोड येथील पारशी चाळ येथे येणार आहेत, अशी माहिती पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व मयूर वाडकर यांना मिळाली. त्यानुसार, गस्त पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. मात्र आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच ते पळ काढू लागले असता त्यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. पकडलेले तिघेही देहुरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.