छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मराठा समाजाला (Maratha reservation) ओबीसीमधून आरक्षण देण्यास थेट विरोध केला आहे. या प्रकरणात मराठा समाज छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झालेला असतानाच त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहे. अशाच एका प्रकरणात छगन भुजबळ यांना धमकवल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Obc resrevation)
छगन भुजबळ यांना सलग १२ मेसेज पाठवून धमकावल्याप्रकरणी संभाजीनगरच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौदागर सातनाक नामक व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील छावणी पोलिस ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा संभाजीनगर मध्ये धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन भुजबळ हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नसंमारंभासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. त्या वेळी ३२ वर्षीय सौदागर सातनाक या व्यक्तीने मोबाइलवर धमक्यांचे मॅसेज पाठवले, असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.
सदरील आरोप करण्यात आलेला व्यक्ती हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील असुन एमबीएचे शिक्षण घेत असल्याचे समजले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यानी फोनव्दारे माफी मागुन दिलगिरी व्यक्त केली असल्याचे पोलिस निरिक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस निरिक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक संदीप काळे हे पुढील तपास करत आहेत.