पुरातत्वशास्त्रज्ञ दररोज नवीन शोध लावतात. कधीकधी हा शोध खूप आश्चर्यकारक असतो, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. काही दिवसांपूर्वी पुरातत्वशास्त्रज्ञांना लाकडी विहीर सापडली आहे. ही विहीर कांस्ययुगातील असून जर्मनीतील बव्हेरिया येथे सापडली आहे. ही विहीर काही सामान्य विहीर नाही. जर्मनीतील पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधलेली विहीर ही एक वरदान देणारी विहीर आहे. सुमारे तीन हजार वर्षे जुन्या असणाऱ्या या विहिरीत 100 हून अधिक प्राचीन कलाकृती सापडल्या आहेत.
विहिरी आणि नद्यांमध्ये नाणी टाकून नवस मागतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. नद्या, तलाव किंवा विहिरीत नाणे टाकून मनोकामना मागितल्यास इच्छा पूर्ण होतात, अशी भारतामध्ये श्रद्धा आहे. ही विहीरही बव्हेरियामध्ये अशाच प्रथेमुळे बांधली गेली. चला जाणून घेऊया इच्छा पूर्ण करणाऱ्या या लाकडी विहिरीबद्दल !
बव्हेरियन स्टेट ऑफिस फॉर मोन्युमेंट प्रोटेक्शन
पुरातत्वशास्त्रज्ञांना या विहिरीमध्ये अनेक कलाकृती सापडल्या आहेत ज्यात 70 हून अधिक जतन केलेली मातीची भांडी, वाट्या, कप आणि इतर भांडी यांचा समावेश आहे. ही दैनंदिन वापरासाठी वापरली जाणारी भांडी नसून विशेष प्रसंगी वापरली जात होती. याव्यतिरिक्त, पुरातत्वशास्त्रज्ञांनी विहिरीतून दोन डझनहून अधिक कपड्यांचे कास्यापासून बनलेली पिन, एक ब्रेसलेट, चार अंबर मोती, दोन धातूचे स्पायरल, प्राण्यांचे दात आणि एक लाकडी स्कूप जप्त केले.
पुरातत्वशास्त्रज्ञ जोचेन हॅबरस्ट्रोह यांनी सांगितले की 3,000 वर्षांहून अधिक काळ टिकणारी विहीर अत्यंत दुर्मिळ आहे. जोचेन हॅबरस्ट्रोह हे बव्हेरियन स्टेट ऑफिस फॉर मोन्युमेंट कन्झर्वेशन येथे पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून काम करतात. जोचेन सांगतात की विहिरीतील लाकडी भिंती जमिनीवर उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. या भिंती जमिनीच्या पाण्याने ओल्या झाल्या नसल्याने विहिरीत सापडलेल्या कलाकृती सुरक्षित आहेत. आता त्यांची अतिशय बारकाईने छाननी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जोचेन म्हणाले की या वस्तूंवरून त्या काळातील लोकांचे दैनंदिन जीवन समजण्याची शक्यता आहे. जतन केलेल्या कलावस्तूंच्या आधारे, संशोधकांचा असा विश्वास आहे की गावकऱ्यांनी त्यांच्या समजुतींमुळेच या वस्तू विहिरीच्या तळाशी ठेवल्या असाव्यात आणि वरून फेकल्या नाहीत. सामान्यतः पाहिल्याप्रमाणे नाणे वरून फेकले जाते.
चांगले पीक येण्यासाठी त्यांनी या वस्तू विहिरीत ठेवल्या असाव्यात असे संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी विहीर सापडली त्या ठिकाणी वितरण केंद्र बांधले जाणार होते, ज्याचे खोदकाम डिसेंबरमध्ये तेथे करण्यात आले होते. 2021 पर्यंत, पुरातत्वशास्त्रज्ञांनी कांस्य युग आणि सुरुवातीच्या मध्ययुगातील 13,500 पेक्षा जास्त कलाकृती शोधल्या आहेत. बव्हेरियन स्टेट ऑफिस फॉर मोन्युमेंट कन्झर्वेशनचे संशोधक या विहिरीत सापडलेल्या साहित्याचा अभ्यास करत आहेत.